कृषीमंत्री दादा भुसे यांच्या छाप्यानंतरही शहरात बाजार समितीतील परिस्थिती बदललेली नाही. युरियासारख्या महत्वाच्या खताचे लिंकिंग बिनदिक्कत सुरू असल्याची बाब सांजवार्ता ने केलेल्या पाहणीत आढळून आली. व्यापारी सावध झाले असले तरीही मंत्र्यांच्या छाप्याला घाबरलेही नाही एवढे मात्र नक्की !
खताचा साठा असूनही शेतकर्यांना दिले जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने रविवारी खुद्द कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबादेत येऊन बाजार समितीतील एका दुकानावर छापा टाकला होता. तब्बल दोन तास मंत्रीमहोदय शहरात तळ ठोकून होते. शेतकर्यांना लागणार्या महत्त्वाच्या युरिया खताची लिंकिंग होत असल्याचा भंडाफोड मंत्र्यांनीच केला. त्याच बरोबर युरियाची चढ्या भावाने विक्री होत असल्याचा दावाही मंत्र्यांनी केला होता. सांजवार्ता प्रतिनिधीने दुसर्याच दिवशी बाजार समिती मध्ये छापा टाकलेल्या दुकाना लगत असलेल्या काही दुकानांवर जाऊन खताची मागणी केली. यावेळी अनेक दुकानदारांनी संशयाने पाहत युरिया नसल्याचे सांगितले. स्टॉक बोर्डवर ही खताची नोंद ठेवलेली नव्हती. याबाबत विचारले असता येणारच आहे आले की लिहिणार आहोत असे उत्तर दिले. काही दुकानदारांनी सावध होत, कुठून आलात ? नाव काय ? आपले असे प्रश्न करीत चाचपणी केली. गंमत म्हणजे मंत्र्यांना दिलेली उत्तरे दुकानदारांनी सदर प्रतिनिधीला दिली.
बहुतेक व्यापारी सावध !
कालच्या प्रकारानंतर बाजार समितीतील बहुतेक व्यापारी सावध झाले होते. त्यामुळे स्टॉक रजिस्टर सह भागफलक व्यवस्थित लिहिला. युरियाचा भावही ठळक 266 रुपये या ठळक अक्षरात लिहिला होता. मात्र येणार्या प्रत्येक ग्राहकाची चौकशी केली जात होती. कोठून आलात ? काय नाव आपले. त्याचबरोबर गावातील इतर ओळख विचारली जात होती. अनोळखी ग्राहकांना संशयाच्या नजरेने पाहिले जाई.
काय असते लिंकिंग !
कृषी व्यवसायात एक प्रकारची चेन कार्यरत आहे. कमी दर्जाची खते -बियाणे शेतकर्यांच्या माथी मारण्यासाठी ही लिंक काम करते. विशेषतः युरियासारख्या खताला मोठी मागणी असल्याने लिंकिंगमध्ये सध्या हे खत टॉप वर आहे. शेतकर्यांनी युरियाची मागणी केली की, व्यापारी इतर खत घेण्याची अट टाकतात. त्याचबरोबर अर्ध्या गोण्या जाड युरिया घेण्याची सक्ती करतात.
80 टक्के बाजार उधारीचा
बियाणे खत विक्रीचा हंगाम अवघ्या दोन-तीन महिन्यांचा असतो. याच काळात जवळपास 80 ते 90 टक्के व्यवसाय उरकला जातो. जवळपास 70 ते 80 टक्के व्यवसाय उधारीवर होत असतो. ग्रामीण भागात तर परिस्थिती अवघड आहे. शेतकरी व्यापार्यांवर अवलंबून असतो. खिशात पैसा नसल्याने व्यापार्याची मनधरणी करावी लागते.
व्यापार्यांवर बक्षिसांची खैरात
खत-बियाणे निर्मिती, विक्री व्यवसायात नवनवीन कंपन्यांची भर पडत आहे.कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे अधिकाधिक नफा व्यापार्यांना देण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचबरोबर मोठमोठी बक्षिसे, विदेश दौरे, कार यासह अनेक प्रकारच्या बक्षिसांची लालूच कंपन्या व्यापार्यांना देतात.